माटरगाव बु. येथील विविध मूलभूत नागरी समस्यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यात यावे, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता 'भीक मांगो आंदोलन' करण्यात येईल, असा इशारा विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
याबाबत ग्रामपंचायतीला निवेदन सादर करण्यात आले असून, त्यामध्ये गावातील दूषित पाणीपुरवठा तात्काळ बंद करून नवीन पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा बंद करावा, नवीन पाणीपुरवठा योजनेबाबत लेखी माहिती द्यावी, पाण्याची गुणवत्ता तपासूनच पुरवठा करावा, घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्यावी, दलित वस्तीसाठीच्या १५ टक्के निधीतून नाली, रस्ते व इतर मूलभूत सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात, तसेच गावात जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
याशिवाय गावातील अंतर्गत रस्ते, नाल्यांची दुरुस्ती, सांडपाण्याची विल्हेवाट, आर.ओ. प्लांट सुरू करणे, बायपास ते बोरडी नदी पुलापर्यंतचा रस्ता दुरुस्त करणे, आरोग्य शिबिर आयोजित करणे, ग्रामविस्तार अधिकारी कायमस्वरूपी ग्रामपंचायतीत उपलब्ध ठेवणे, शाळांमध्ये शिक्षकांची संख्या वाढविणे तसेच बीएलओमार्फत घराघरांत जाऊन मतदार पडताळणी करण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या कालावधीत सर्व मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थ, विविध सामाजिक संघटना व नागरिक ग्रामपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने 'भीक मांगो आंदोलन' करतील, असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित शासकीय यंत्रणेची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हे निवेदन प्रशांत भिकाजी तायडे (ऑल इंडिया पँथर सेना, जिल्हा सचिव, बुलढाणा), नितीन सूर्यभान वाकोडे, शेख अयाज शेख अमीर, शांताराम काशीराम दामोदर तसेच इतर सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने सादर करण्यात आले. निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, उपविभागीय अभियंता (पाणीपुरवठा) आणि शिक्षण अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
जर आमच्या मागण्या सात दिवसात पूर्ण नाही झाल्या तर माटरगाव बु.येथील ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामपंचायत अधिकारी/सचिव व सदस्य यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी नागरिकांची मागणी आहे.
मुख्यसंपादक:- नितीन सूर्यभान वाकोडे ९९७५९६९२०५

Post a Comment
0 Comments