लाडकी बहीण योजना: मार्च आणि एप्रिलच्या हप्त्यापासून ५०% महिला अद्यापही वंचित; अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील महिलांमध्ये तीव्र नाराजी
खामगाव - राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'बाबत एक मोठी आणि चिंताजनक माहिती समोर येत आहे. ज्या महिलांची आधार आणि बँक केवायसी (KYC) फेब्रुवारीअखेरपर्यंत पूर्ण होती, त्यांना फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये मिळाले आहेत. मात्र, त्यानंतरच्या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यांचे वाटप करताना मोठा सावळागोंधळ निर्माण झाला असून, राज्यातील जवळपास ५०% पात्र महिलांना अद्यापही या दोन महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत. यामध्ये अनुसूचित जाती (SC) समाजातील बहुतांश महिलांचा समावेश** असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या तांत्रिक किंवा प्रशासकीय दिरंगाईचा सर्वाधिक फटका अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील महिलांना बसल्याचे चित्र आहे. या प्रवर्गातील बहुतांश पात्र महिलांचे हप्ते रखडल्याने, 'शासकीय यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का?' असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
चौकट -
.५०% महिलांना लाभ, ५०% प्रतीक्षेत
केवायसी प्रक्रिया पूर्ण आणि अचूक असूनही केवळ ५०% लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. उर्वरित ५०% महिलांचे बँक खाती आणि आधार जोडणी योग्य असतानाही त्यांच्या खात्यात अद्याप एकही रुपया जमा झालेला नाही.
चौकट -
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही,असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
सदर वस्तुस्थिती लक्षात घेता, चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महिला व बाल विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments